Ads
Ads

जामखेडमध्ये जन्म-मृत्यू नोंदीसाठी मागितली १० हजारांची लाच ! ५ हजारांची लाच स्वीकारताना ग्रामपंचायत अधिकारी ढाकणे एसीबी ने पकडला जाळ्यात!

जामखेडमध्ये जन्म-मृत्यू नोंदीसाठी मागितली १० हजारांची लाच ! ५ हजारांची लाच स्वीकारताना ग्रामपंचायत अधिकारी ढाकणे एसीबी ने पकडला जाळ्यात!

अहिल्यानगर (प्रतिनिधी) -

ग्रामपंचायतीच्या सन १९८८ च्या जन्म-मृत्यू नोंदवहीतील माहिती देण्यासाठी तब्बल १० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या आणि त्यापैकी ५ हजार रुपयांची रोख रक्कम स्वीकारताना ग्रामपंचायत अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले. महादेव मल्हारी ढाकणे (वय ५२, रा. राम मंदिर गल्ली, जामखेड) असे लाचखोर ग्रामपंचायत अधिकाऱ्याचे नाव असून, ते जातेगाव (ता. जामखेड) येथे ग्रामपंचायत अधिकारी (वर्ग-३) म्हणून कार्यरत आहेत.

काय आहे प्रकरण?

तक्रारदाराने ११ ऑगस्ट २०२६ रोजी जातेगाव ग्रामपंचायतीच्या सन १९८८ मधील जन्म-मृत्यू नोंदवहीतील माहिती मिळण्याबाबत ग्रामपंचायत अधिकारी महादेव ढाकणे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला होता. सदर माहिती देण्यासाठी ढाकणे यांनी "तुम्हाला जेवढे पैसे देता येतील, तेवढे द्या" असे सांगून लाचेची मागणी केली. तक्रारदाराची लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (अहिल्यानगर) येथे तक्रार नोंदवली.

हॉटेल महाभगवती येथे सापळा

तक्रारीची पडताळणी करण्यासाठी जामखेड येथील हॉटेल महाभगवती येथे सापळा रचण्यात आला. पडताळणीदरम्यान आरोपी ढाकणे याने पंचांसमक्ष अर्जदाराकडे १०,००० रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदाराकडे ५,००० रुपये रोख असल्याने त्यांनी ते दिले आणि उर्वरित ५,००० रुपये 'फोन-पे' (PhonePe) द्वारे देतो असे सांगितल्यावर ढाकणे याने त्यास सहमती दर्शवली.

तक्रारदाराकडून ५ हजार रुपयांची रोख रक्कम स्वीकारताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ढाकणे याला ताब्यात घेतले. याप्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा, १९८८ च्या कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीस १२ ऑगस्ट रोजी मध्यरात्री २.४३ वाजता अटक करण्यात आली आहे.

कारवाई करणारे पथक

ही कारवाई नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक प्रदिप मैराळे आणि कविता फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक अजित त्रिपुटे, पोलीस निरीक्षक सविता तांबे, पोलीस नाईक चंद्रकांत काळे, पोलीस शिपाई शेखर वाघ आणि चालक हवालदार करांडे यांच्या पथकाने केली.

नागरिकांना आवाहन: सरकारी कामासाठी कोणत्याही लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्वरित लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, महाराष्ट्र राज्य (टोल-फ्री क्र. १०६४ किंवा व्हॉट्सॲप ९९३०९९७७००) यांच्याशी संपर्क साधावा.