११ लाखांची लाच मागून फाईल आडवली! एक्साईज इन्स्पेक्टर पाटीलला एसीबीने थेट कोठडी दाखवली!
पुणे ( भगवान श्रीमंदिलकर ) - शासकीय खुर्चीचा दुरुपयोग करून तब्बल २२ लाख रुपयांची लाच उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या राज्य उत्पादन शुल्क (एक्साईज) विभागाच्या लाचखोर निरीक्षकाचा 'अँटी करप्शन ब्युरो'ने (एसीबी) पर्दाफाश केला आहे. एफएल-३ आणि मायक्रो ब्रेव्हरीच्या परवान्यासाठी तडजोडीअंती ११ लाख रुपये मागणाऱ्या येरवडा एच-झोनचे इन्स्पेक्टर जितेंद्र हरिश्चंद्र पाटील (वय ४७) यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या असून एसीबीने थेट तुरुंगाची हवा दाखवली आहे.
नेमका प्रकार काय? मिळालेल्या माहितीनुसार, एका लायसन्स कन्सल्टंट तक्रारदाराने एका फर्मच्या 'एफएल ३' (FL-3) परवान्याची फाईल मंजुरीसाठी पुढे पाठवण्यासाठी व 'मायक्रो ब्रेव्हरी'ची फाईल मंजूर करून घेण्यासाठी अर्ज केला होता. हे काम नियमात असतानाही इन्स्पेक्टर जितेंद्र पाटील याने दोन्ही फाईल्स अडकवून ठेवल्या आणि त्या मंजूर करण्यासाठी एकूण २० लाख रुपयांच्या लाचेची थेट मागणी केली. याप्रकरणी तक्रारदाराने १० एप्रिल २०२६ रोजी पुणे एसीबीकडे धाव घेऊन तक्रार नोंदवली.
तीन वेळा पडताळणी; लाचखोर जाळ्यात अडकला! एसीबीच्या पथकाने १३ एप्रिल, २१ मे आणि २२ मे २०२६ रोजी या तक्रारीची अत्यंत गुप्तपणे पडताळणी केली. या पडताळणीदरम्यान आरोपी लोकसेवक पाटील याने तक्रारदाराकडे सुरुवातीला तब्बल २२ लाख रुपये मागितले आणि अखेर तडजोडीअंती ११ लाख रुपयांवर ठाम राहिल्याचे निष्पन्न झाले.
येरवडा पोलिसांत गुन्हा; शहरात खळबळ पाटील याचा लाचखोरपणा उघडकीस आल्यानंतर १० ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी येरवडा पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा (गु.रजि.क्र. ३१-८/२०२६) दाखल करण्यात आला असून, सायंकाळी ५:१० वाजता त्याला अधिकृतपणे अटक करण्यात आली.
चौकट:
आरोपी: जितेंद्र हरिश्चंद्र पाटील (वय ४७), इन्स्पेक्टर एक्साईज, एच-झोन, येरवडा, पुणे (रा. कर्वे रोड, कोथरूड, मूळ रा. परभणी).
कारवाई करणारे पथक: पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे व अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक सतीश वाळके, भूषण ठाकूर, विशाल माने, विकास आडके, वनिता गोरे आणि चंद्रकांत कदम.
'जागृत शोध' आवाहन: लाच मागणाऱ्या कोणत्याही भ्रष्ट अधिकाऱ्याची गय करू नका! लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या 1064 या टोल-फ्री क्रमांकावर तात्काळ संपर्क साधा.


