महसूल अधिकारी निलंबन कारवाई विरोधात शिरूर येथे सामूहिक रजा आंदोलन
शिरूर (प्रतिनिधी ) -
महाराष्ट्र राज्य ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी संघ,शाखा शिरूर यांच्यावतीने विधीमंडळ अधिवेशन काळात तहसीलदार,मंडळ अधिकारी तसेच ग्राममहसूल अधिकारी यांच्यावर करण्यात आलेली निलंबन कारवाई अन्यायकारक असल्याचा आरोप करीत ती तात्काळ मागे घ्यावी,या मागणीसाठी सामूहिक रजा आंदोलन सुरू करण्यात आले आहे.आज या आंदोलनाचा तीसरा दिवस होता.अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष प्रशांत लोखंडे यांनी दिली.
यासंदर्भात तहसीलदार यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की,महसूलमंत्री यांनी अधिवेशन काळात संबंधित अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली असून,ती अन्यायकारक आहे.सदर निलंबन तात्काळ रद्द करून सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना सन्मानाने पूर्वपदावर पदस्थापना देण्यात यावी अशी मागणी संघटनेने केली आहे.
निवेदनात पुढे नमूद करण्यात आले आहे की,निलंबन कारवाई मागे घेण्यात येईपर्यंत राज्य संघटना व जिल्हा संघटनेच्या निर्देशानुसार तहसीलदार व नायब तहसीलदार संघटना,महसूल कर्मचारी संघटना,ग्राममहसूल अधिकारी व मंडळ अधिकारी संघटना,वाहन चालक संघटना तसेच महसूल सेवक संघटना यांच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल. तसेच न्याय मिळेपर्यंत सर्व कर्मचारी सामूहिक रजेवर राहणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.
या आंदोलनामुळे महसूल विभागाच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता असून, शासनाने तातडीने तोडगा काढावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.


