Ads
Ads

"ससूनचा आरोग्य मेळा ठरला जनतेचा आधार; हजारो नागरिकांना मिळाला उपचारांचा अधिकार!"

अजितदादा पवार जयंतीनिमित्त विशेष आरोग्य व रक्तदान शिबिर; २,५९१ नागरिकांनी घेतला विविध आरोग्य सेवांचा लाभ. 

 

पुणे (भगवान श्रीमंदिलकर ) - महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त बी. जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ससून सर्वोपचार रुग्णालय, पुणे येथे विशेष आरोग्य शिबिर व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. नागरिकांना एकाच ठिकाणी प्रतिबंधात्मक, निदानात्मक आणि उपचारात्मक आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 

शिबिराचे उद्घाटन आमदार सुनील कांबळे आणि आमदार बापूसाहेब पठारे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रुग्णालय प्रशासन, विविध विभागांचे प्रमुख, निवासी डॉक्टर, परिचारिका, आंतरवासीय विद्यार्थी आणि आरोग्य कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी विविध आरोग्य तपासणी स्टॉलना भेट देत नागरिकांशी संवाद साधला व वेळेवर निदान आणि Image उपचाराचे महत्त्व अधोरेखित केले. 

या विशेष आरोग्य शिबिरात २,५९१ नागरिकांनी विविध आरोग्य सेवांचा लाभ घेतला. रक्तदान शिबिर, स्तन कर्करोग तपासणी, गर्भाशय मुख कर्करोग तपासणी, बोन मिनरल डेन्सिटी (BMD), नेत्र व मोतीबिंदू तपासणी, मुख कर्करोग तपासणी, स्क्रब टायफस तपासणी, ज्वरजन्य आजार तपासणी तसेच आरोग्य जनजागृती अशा विविध सेवा नागरिकांना विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आल्या. 

आरोग्यविषयक जनजागृती वाढवणे, आजारांचे लवकर निदान करणे आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचे रुग्णालय प्रशासनाने स्पष्ट केले. या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता निर्माण होण्यास मोठी मदत होणार असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले.