Ads
Ads

"शंभराच्या स्टॅम्पवर दीडशेचा डाव; लाचखोर अधिकृत विक्रेत्यावर एसीबीचा घाव!"

सरकारी दरापेक्षा अधिक पैसे उकळल्याप्रकरणी छत्रपती संभाजीनगर येथील अधिकृत स्टॅम्प विक्रेतीला रंगेहाथ अटक

छत्रपती संभाजीनगर, (प्रतिनिधी ) - 

सरकारने निश्चित केलेल्या दरापेक्षा अधिक पैसे उकळून नागरिकांची आर्थिक लूट करणाऱ्या अधिकृत स्टॅम्प विक्रेतीवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) धडक कारवाई केली. शंभर रुपयांच्या सात बॉण्ड पेपरसाठी प्रत्येकी २० रुपये अतिरिक्त कमिशनची मागणी करून एकूण १४० रुपयांची लाच स्वीकारताना अधिकृत स्टॅम्प विक्रेती श्रीमती शैला शशिकांत बोनढे (वय ५४) यांना रंगेहाथ अटक करण्यात आली.

तक्रारदारांना त्यांच्या संस्थेच्या कामासाठी सात बॉण्ड पेपरची आवश्यकता होती. बाजार चौकातील अधिकृत स्टॅम्प विक्रेतीकडे ते बॉण्ड पेपर खरेदीसाठी गेले असता, सरकारने निश्चित केलेल्या किमतीव्यतिरिक्त प्रत्येक बॉण्डवर २० रुपये अधिक द्यावे लागतील, अशी मागणी करण्यात आली. सात बॉण्ड पेपरची अधिकृत किंमत ७०० रुपये असताना Image अतिरिक्त १४० रुपये देण्याचा आग्रह धरल्याने तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली.

एसीबीने तक्रारीची पडताळणी करून १० जुलै रोजी सापळा रचला. त्यावेळी आरोपी विक्रेतीने एकूण ८४० रुपये स्वीकारताच पथकाने तिला रंगेहाथ ताब्यात घेतले. याप्रकरणी छत्रपती संभाजीनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

ही कारवाई पोलिस अधीक्षक श्रीमती मार्गरेट केरकर, अपर पोलिस अधीक्षक श्री. शशिकांत बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक श्री. अमोल शिंदे यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

दरम्यान, सरकारी सेवेशी संबंधित कोणताही अधिकारी, कर्मचारी किंवा अधिकृत विक्रेता अतिरिक्त पैशांची मागणी करत असल्यास नागरिकांनी तत्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून तक्रार नोंदवावी, असे आवाहन एसीबीने केले आहे.

Image