Ads
Ads

दहा लाखांचा डाव, पाच लाखांवर ठाव; एपीआयवर एसीबीचा घाव!

चाकण उत्तर पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलिस निरीक्षकाविरुद्ध भ्रष्टाचाराचा गुन्हा

जागृत शोध

पुणे (भगवान श्रीमंदिलकर) : चाकण उत्तर पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलिस निरीक्षकाने एका प्रकरणात तक्रार दाराच्या बाजूने निर्णय देण्यासाठी १० लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमुळे पोलिस दलात खळबळ उडाल्याचे पाहायला मिळाले.

      तक्रारदार व त्यांच्या मुलाविरुद्ध दाखल असलेल्या दोन अर्जांमध्ये अनुकूल निर्णय मिळवून देण्याच्या मोबदल्यात संबंधित अधिकाऱ्याने सुरुवातीला १० लाख रुपयांची लाच मागितली होती. त्यानंतर चर्चेनंतर ही रक्कम ५ लाख रुपयांवर निश्चित करण्यात आली.पहिल्या टप्प्यात 2,50,000/- अर्ज निकाली काढल्यानंतर 2,50,000/- लाख रुपये मागितल्याचे निष्पन्न झाले.

   तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर अधिकाऱ्याच्या मागणीची पडताळणी करण्यात आली. Image पडताळणीत लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्याने संबंधित सहाय्यक पोलिस निरीक्षकाविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम, १९८८ च्या कलम ७ अंतर्गत निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कारवाईमुळे पोलिस दलातील भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सरकारी पदाचा गैरवापर करून लाच मागणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची गरज असल्याचे नागरिकातून बोलले जात आहे.

            लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणताही शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी कायदेशीर शुल्काव्यतिरिक्त पैशांची मागणी करत असल्यास तात्काळ एसीबीकडे तक्रार करावी असे आवाहन करण्यात आले.

Image