दोन भामट्यांना बेड्या ठोकून चोरांची मोडली कंबर; पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेकडून तब्बल ६ गुन्ह्यांची केली उकल!
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या पथकाची धडक कारवाई
जामखेडमधून दोन सराईत जेरबंद; ५५ ग्रॅम सोन्याचे दागिने व दुचाकीसह ९ लाखांचा मुद्देमाल जप्त
दौंड, यवत, जेजुरी, वडगाव निंबाळकर परिसरातील गुन्हे उघडकीस
पुणे (भगवान श्रीमंदिलकर ) -
पुणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये रस्त्याने जाणाऱ्या महिलांचे सोन्याचे दागिने हिसकावणाऱ्या (चैन स्नॅचिंग) आणि जबरी चोऱ्या करणाऱ्या गुन्हेगारांवर पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) जोरदार प्रहार केला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखालील विशेष तपास पथकाने अत्यंत नियोजनबद्ध सापळा रचून दोन सराईत भामट्यांना बेड्या ठोकल्या. या कारवाईमुळे दौंड, यवत, जेजुरी आणि वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घडलेले तब्बल ६ गंभीर गुन्हे एकाच वेळी उघडकीस आले असून, गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.
गुन्ह्यांची कार्यपद्धती हेरून रचला सापळा
दौंड पोलीस स्टेशनच्या हद्दीत नुकत्याच घडलेल्या जबरी चोरीच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी मालमत्तेचे गुन्हे तात्काळ उघडकीस आणण्याचे निर्देश दिले होते. यावर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांनी तात्काळ सूत्रे हाती घेत आपल्या पथकाला कामाला लावले. गुन्हे घडलेली ठिकाणे, वेळ, संशयितांची गुन्हे करण्याची कार्यपद्धती (Modus Operandi) आणि सीसीटीव्ही फुटेजचे तांत्रिक विश्लेषण करत पोलीस निरीक्षक क्षीरसागर यांच्या पथकाने माहिती संकलित केली.
जामखेडमधून आरोपींना शिताफीने घेतले ताब्यात
तपासादरम्यान गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार, जबरी चोऱ्या व चैन स्नॅचिंग करणारे इसम दीपक बलभीम पवार (वय २८, रा. आरोळे वस्ती, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर) व युवराज सचिन लोखंडे (वय २४, रा. उद्धट, ता. इंदापूर, जि. पुणे) हे दोघे जामखेड परिसरात असल्याची पक्की खबर मिळाली. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तत्काळ जामखेड येथे धाव घेऊन आरोळे वस्ती परिसरात छापा टाकला आणि संशयितांना मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले.
६ गुन्ह्यांची कबुली, ९ लाखांचा मुद्देमाल जप्त
आरोपींकडे पोलिसी खाक्या दाखवत कसून चौकशी केली असता, त्यांनी दौंड पोलीस ठाण्यातील २, यवत पोलीस ठाण्यातील २, वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यातील १ आणि जेजुरी पोलीस ठाण्यातील १ अशा एकूण ६ जबरी चोरी व चैन स्नॅचिंगच्या गुन्ह्यांची स्पष्ट कबुली दिली. आरोपींकडून ५५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि गुन्ह्यांसाठी वापरलेली मोटारसायकल असा एकूण ९ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची यशस्वी कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, बारामती विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, दौंडचे उपविभागीय पोलीस अधिकारी बापुसाहेब धडस यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, दौंडचे पोलीस निरीक्षक हेमंत शेंडगे, सहायक पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर राऊत, शंकर वाघमारे, तसेच पोलीस अंमलदार सचिन घाडगे, आसिफ शेख, गुरुनाथ गायकवाड, सुभाष राऊत, राजू मोमीन, विकास कापरे, भारत मोहोळ, चेतन पाटील, अंतुल पठाण आणि अंकुश दळवी यांनी केली आहे.
गुन्हेगारांवर वचक निर्माण करणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखेच्या आणि पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या या धडक कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत असून, या गुन्ह्यांचा पुढील तपास दौंड पोलीस करत आहेत.


