Ads
Ads

बनावट नोंदी आणि खोटे शिक्के बनवून खातेदारांच्या कष्टाच्या पैशांवर गोलेगावच्या डाकपालाने मारला १५ लाखांचा डल्ला; शिरूर पोलिस ठाण्यात दाखल झाला गुन्हा!

बनावट नोंदी आणि खोटे शिक्के बनवून खातेदारांच्या कष्टाच्या पैशांवर गोलेगावच्या डाकपालाने मारला १५ लाखांचा डल्ला; शिरूर पोलिस ठाण्यात दाखल झाला गुन्हा!

शिरूर (प्रतिनिधी) -

ग्रामीण भागातील नागरिकांचा हक्काचा आणि विश्वासाचा आधार समजल्या जाणाऱ्या टपाल कार्यालयातील एका गंभीर आर्थिक गैरव्यवहाराने शिरूर तालुक्यात मोठी खळबळ उडवून दिली आहे. शिरूर तालुक्यातील गोलेगाव शाखा डाकघरात नागरिकांनी कष्टाने साठवलेली मुदत ठेव (FD) रक्कम मूळ सरकारी खात्यात जमा न करता परस्पर लाटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. स्वतःच्या हस्ताक्षरात खोट्या नोंदी करून आणि बनावट खाती दाखवून सुमारे १५ लाख ४४ हजार रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी तत्कालीन शाखा डाकपालावर शिरूर पोलीस ठाण्यात फसवणुकीसह विविध गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 बनावट शिक्के आणि पासबुकांचा खेळ

शिरूर तालुक्यातील रांजणगाव गणपती येथील रहिवासी असलेला आरोपी राजेश जबा खुडे (वय ५६) हा गोलेगाव शाखा डाकघरामध्ये शाखा डाकपाल (Branch Postmaster) म्हणून कार्यरत होता. ग्रामीण भागातील शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्य नागरिक सुरक्षितता म्हणून टपाल खात्यात मुदत ठेव योजनांमध्ये पैसे गुंतवतात. याचाच गैरफायदा घेत आरोपीने विविध खातेदारांकडून मुदत ठेवीपोटी लाखो रुपयांची रोख रक्कम स्वीकारली. खातेदारांना संशय येऊ नये म्हणून त्याने त्यांना स्वतःच्या हस्ताक्षरात अधिकृत दिसणारी खातेपुस्तके दिली, त्यावर खाते क्रमांक नोंदवले आणि टपाल कार्यालयाचे अधिकृत शिक्केही मारून दिले. मात्र, प्रत्यक्षात ही रक्कम टपाल खात्याच्या मूळ सरकारी तिजोरीत जमा न करता स्वतःच्या फायद्यासाठी परस्पर हडप केली.

तक्रारींनंतर झाली तपासणी; गैरव्यवहाराचा भांडाफोड

काही खातेदारांना आपल्या ठेवींच्या व्यवहाराबाबत संशय आल्यानंतर त्यांनी बारामती डाक विभागाकडे तोंडी व लेखी तक्रारी दाखल केल्या. या तक्रारींची अत्यंत गंभीर दखल घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गोलेगाव शाखा डाकघराच्या संपूर्ण कामकाजाची १०० टक्के सखोल तपासणी सुरू केली. या तपासणीदरम्यान रवींद्र कोंडीबा थेरुकर, योगिता रवींद्र थेरुकर, मोहन शंकर रसाळ आणि पांडुरंग भगवान वाखारे या खातेदारांच्या मुदत ठेव व्यवहारांशी संबंधित कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. प्रत्यक्ष सरकारी खात्यातील जमा रक्कम आणि खातेदारांकडील पासबुकांमधील नोंदी यांत मोठी तफावत आढळली. चौकशीअंती एकूण १५ लाख ४४ हजार रुपयांचा सुनियोजित अपहार झाल्याचे स्पष्ट निष्पन्न झाले.

     याबाबत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून,या संपूर्ण आर्थिक फसवणूक प्रकरणी बारामती डाक विभागाच्या पूर्व उपविभाग (केडगाव) येथील सहायक अधीक्षक डाकघर शशिकांत सिंग (वय ४५, रा. केडगाव, ता. दौंड) यांनी शिरूर पोलीस ठाण्यात अधिकृत फिर्याद दिली. या फिर्यादीवरून आरोपी राजेश जबा खुडे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ मधील कलम ३१८(४) (फसवणूक), ३१६(५) (सरकारी सेवकाकडून विश्वासघात), ३३६(२), ३३६(३), ३३८, ३३७, ३४१(२) आणि ३४४ (बनावट कागदपत्रे व खोट्या नोंदी तयार करणे) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पुढील तपास सुरू असून आणखी खातेदार फसवले गेले असण्याची शक्यता ग्रामीण भागातील नागरिकांच्या कष्टाच्या पैशांवर अशा प्रकारे डल्ला मारल्यामुळे गोलेगावसह पंचक्रोशीत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या गैरव्यवहारात आरोपीने अशाच पद्धतीने आणखी काही गरीब व सर्वसामान्य खातेदारांची फसवणूक केली आहे का? याचा सखोल शोध पोलीस घेत आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक शेळके करत आहेत.