कोल्हापूर (प्रतिनिधी) - के. पी. पाटील यांनी आज मातोश्री येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला.
जिल्ह्यातील राधानगरी- भुदरगड विधानसभेचे माजी आमदार के. पी. पाटील (K. P. Patil) यांनी आज बुधवारी (दि.२३) मातोश्री येथे त्यांच्या सहकाऱ्यांसह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला. त्यांच्या मनगटावर शिवबंधन बांधून उद्धव ठाकरे यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत, शिवसेना नेते विनायक राऊत, आमदार मिलिंद नार्वेकर आणि इतर पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.
यापूर्वी के. पी. पाटील हे राधानगरी-भुदरगड मतदारसंघातून दोनवेळा राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर २००४ आणि २००९ च्या निवडणुकीत विधानसभेवर निवडून आले होते. २०१४ आणि २०१९ साली शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर येथून निवडून आले आहेत. आता राधानगरी विधानसभा मतदारसंघातून (Maharashtra Assembly polls) प्रकाश आबिटकर (Prakash Abitkar) यांना शिवसेना शिंदे गटाने उमेदवारी दिली आहे.के. पी. पाटील आता ठाकरे गटात गेल्याने ए. वाय. पाटील काय भूमिका घेतात? याकडे लक्ष लागले आहे. कारण बिद्री कारखान्याच्या निवडणुकीत के. पी. पाटील यांच्या विरोधात प्रकाश आबिटकर यांच्यासमवेत के. पी. पाटील यांचे मेहुणे ए. वाय. पाटील यांनी पॅनेल केले होते; मात्र या निवडणुकीत के. पी. पाटील यांनी सर्वच्या सर्व जागा जिंकून कारखान्यावरील त्यांचे वर्चस्व कायम राखले होते.


