सोनेसांगवी शाळेचे शिष्यवृत्ती व नवोदय परीक्षेत दुहेरी यश
शिरूर ✍️ – प्रतिनिधी ✍️ –
शिक्षण क्षेत्रात सातत्याने नवनवे उपक्रम राबवणाऱ्या सोनेसांगवी जिल्हा परिषदेच्या शाळेने सन 2024-25 या शैक्षणिक वर्षात ऐतिहासिक कामगिरी बजावली आहे. इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसह नवोदय प्रवेश परीक्षेत या शाळेने दुहेरी यश मिळवून गावाचे नाव उज्ज्वल केले आहे.
या शाळेच्या ७७ वर्षांच्या इतिहासात प्रथमच जवाहर नवोदय विद्यालयासाठी प्राजक्ता विनोद सदाफुले हिची निवड झाली आहे. प्राजक्ताने शिष्यवृत्ती परीक्षेतही झळकदार कामगिरी करत तब्बल 256 गुण मिळवून जिल्हा गुणवत्ता यादीत आपले नाव नोंदवले आहे.
शिष्यवृत्ती परीक्षेत आदित्य उल्हास डांगे याने 242 गुण मिळवून मेरिटच्या उंबरठ्यावर धडक दिली असून सृष्टी संदीप बोऱ्हाडे हिने 238 गुण मिळवले, तर ओम सुरेश दाते याने 232 गुण मिळवले. याशिवाय 200 पेक्षा जास्त गुण मिळवणारे आणखी पाच विद्यार्थी शाळेतून घडले आहेत.
या यशामागे इयत्ता पाचवीच्या वर्गाचे वर्गशिक्षक श्री. गुलाबराव दगडू तळोले यांचे अथक मार्गदर्शन लाभले. या दुहेरी यशाबद्दल मुख्याध्यापक श्री. नामदेव गायकवाड यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. तसेच केंद्रप्रमुख श्री. किसन पर्वती शिंदे, विस्तार अधिकारी श्री. खोडदे साहेब, गटशिक्षणाधिकारी कळमकर साहेब, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. शरद काळे, उपाध्यक्ष श्री. विजय बोऱ्हाडे, गावचे सर्पंच सौ. रेखाताई मल्हारीशेठ काळे, तसेच शिरूर-आंबेगाव शिवसेना तालुकाप्रमुख श्री. मल्हारीशेठ काळे यांनी सर्व विद्यार्थी आणि वर्गशिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
या दुहेरी यशामुळे सोनेसांगवी गावातील पालक, माजी विद्यार्थी आणि ग्रामस्थांमध्ये आनंदाचा उत्सव साजरा होत आहे. शाळेच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना आणि विद्यार्थ्यांच्या कष्टांना हे यश अर्पण आहे, अशी प्रतिक्रिया सर्वत्र व्यक्त होत आहे.


