Ads
Ads

शिरूर विधानसभा मतदार संघात महिला व बालकांसाठी पाळणाघराची सुविधा

 

पुणे,(प्रतिनिधी) - शिरूर विधानसभा मतदारसंघात महिलांचा मतदार प्रक्रियेत सहभाग वाढविण्यासाठी बाल विकास प्रकल्पाच्यावतीने विविध ठिकाणच्या मतदान केंद्रावर महिला व बालकांसाठी विशेष पाळणाघराची सुविधा उपलब्ध करण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी संगीता राजापूरकर यांनी दिली आहे.

बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान केंद्रावर  महिला व बालकांसाठी विशेष पाळणाघराची सोय करण्यात आलेली असून यामुळे महिलांना मतदान प्रक्रियेत आरामदायक वातावरणात मतदान करणे सोयीचे होणार आहे. पाळणाघरासाठी संबंधित गावातील अंगणवाडी सेविका यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. पाळणाघराच्या ठिकाणी एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या माध्यमातून महिला मतदार यांच्यासोबत आलेल्या लहान मुलांसाठी खेळणी देखील उपलब्ध केली जाणार आहेत.

निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी निवडणूक प्रशासनाच्यावतीने स्वीप कार्यक्रम राबवला जात आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने स्थापित करण्यात आलेल्या मतदान केंद्रावर आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन करण्यात आले असून त्याप्रमाणे कार्यवाही केली जात आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर मतदानाची टक्केवारी वाढावी यादृष्टिने प्रयत्न करण्यात येत असल्याचे श्रीमती राजापूरकर  यांनी सांगितले.