टाऊन प्लॅनिंगचा अधिकारी निघाला भ्रष्ट, कायदेशीर उत्पन्नापेक्षा मिळवली जास्त कमाई! ढेकळे पती-पत्नीवर केली लाच लुचपत विभागाने कारवाई!
पुणे (भगवान श्रीमंदिलकर)-
पुणे टाऊन प्लॅनिंग विभागातील सहायक नगर रचनाकार विकास किसन ढेकळे आणि त्यांच्या पत्नी भाग्यश्री ढेकळे यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) धडक कारवाई करत अपसंपदा आणि भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला आहे. वैध उत्पन्नापेक्षा तब्बल २ कोटी ७८ लाख ४१ हजार ५४२ रुपये (१८.४७ टक्के) इतकी अफाट मालमत्ता भ्रष्ट मार्गाने जमवल्याचे एसीबीच्या चौकशीत उघड झाले आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक मुख्यालयाकडून विकास ढेकळे यांच्या मालमत्तेच्या उघड चौकशीचे आदेश प्राप्त झाले होते. सदर चौकशी सुरू असतानाच, ढेकळे यांनी लाचेची मागणी केल्याप्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात आधीच गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर एसीबी पुणे पथकाने १७ ऑगस्ट १९९९ ते २० मार्च २०२५ या कालावधीतील त्यांच्या उत्पन्नाची सखोल तपासणी केली.
या तपासणीत ढेकळे यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून बेकायदेशीररीत्या कोट्यवधींची मालमत्ता जमवल्याचे निष्पन्न झाले. विशेष म्हणजे, या भ्रष्ट कमाईत आणि अपसंपदा धारण करण्यात त्यांची पत्नी भाग्यश्री ढेकळे यांनी प्रोत्साहन (Abetment) दिल्याचे व चौकशीदरम्यान बनावट पावत्या सादर केल्याचे समोर आले आहे.
याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यासह भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ही धडक कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुण्याचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे आणि अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक मनीषा झेंडे व पोलीस उपअधीक्षक सतिश वाळके यांच्या पथकाने केली आहे.


